माझी गोष्ट

डाएट टिकला नाही, सवय टिकली

अपडेट: १२ ऑक्टोबर २०२६ · माझा अनुभव, सल्ला नाही

जिममधील विजय

२०१५ नंतर व्यायाम पूर्ण सुटला होता. गोड, तेलकट, जे समोर येईल ते खायचो. २०१७ पर्यंत वजन खूप वाढलं.

कडक डाएट, आणि तो का टिकला नाही

मग कडक डाएट सुरू केला. रनिंग, सायकलिंग. वजन कमी झालं, पण सोबत मसलही खूप कमी झाले. आणि तो डाएट फार काळ टिकला नाही.

२०१६-१७ मध्ये मी फळं, ब्राऊन राईस, सलाड, ग्रीन टी, ॲपल सायडर व्हिनेगर, हे सगळं खात-पीत होतो. त्यात चुकीचं काहीच नव्हतं. पण २-३ महिन्यांत सगळं बंद व्हायचं. बाहेर ड्युटी लागली की तर पूर्णच.

२०२० ते २०२२ परत सगळं बंद.

डाएट केला, वजन कमी झालं. पण डाएट टिकला नाही. छोट्या सवयी बदलल्या, त्या मात्र टिकल्या.

२०२३: डाएट नाही, लाइफस्टाइल

२०२३ मध्ये ठरवलं, या वेळी डाएट नाही, लाइफस्टाइल बदलायची. जिम सुरू केली आणि खाण्यात फक्त छोटे बदल केले. रोजच्या जेवणातून डीप फ्राईड आणि साखरयुक्त पदार्थ काढले, आणि घरच्या जेवणासोबत प्रोटीन वाढवलं. घरची बिर्याणी मात्र आजही खातो.

परिणाम दिसू लागले. बस्स.

३ वर्षं जिम कशामुळे टिकली

  1. डाएट नाही, घरचं जेवण. त्यात प्रोटीन वाढवलं आणि गोड-तळलेलं बंद केलं.
  2. सातत्य. ३-४ दिवस जिम चुकली तरी पाचव्या दिवशी परत गेलो.
  3. बेसिक व्यायाम, जिममधल्या मशीनवर. ईगो लिफ्टिंग केली नाही, वजन हळूहळू वाढवत गेलो.
मध्ये थांबलो होतो. पण आता थांबायचं नाय. परफेक्ट नाही, अजूनही शिकतोय.

माझी ड्युटी

मी पोलीस ड्युटीवर असतो. बंदोबस्त, प्रवास, नाईट शिफ्ट. जेवण आपल्या हातात नसतं. म्हणून मी नियम साधे ठेवले आणि बाहेर असतानाचा वेगळा विचार केला. तो इथे आहे.

मी डायटिशियन नाही. हे माझे स्वतःचे अनुभव आणि हिशेब आहेत. कॅलरी आणि प्रोटीनचे आकडे ढोबळ आहेत आणि पॅकनुसार बदलतात. आजार किंवा औषधे असतील तर आहार बदलण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.